सर्व समावेशक विकास : नवी आव्हाने

प्रतिक्रिया

सर्व समावेशक विकास ही एक व्यापक कल्पना असून त्यामध्ये अधिकाधिक लोकांना विकासात सहभागी करून घेण्यावर भर दिला जातो. विकासाची फळे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे आणि विकासाच्या प्रक्रियेत अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेणे या दृष्टीने नवीन सहस्त्रकात विशेष प्रयत्न केले जात आहेत. सर्व समावेशक विकास हा विकसनशील देशांसाठी एक मंत्रवत शब्द बनला आहे. नवीन सहस्त्रकात  शाश्वत व सर्व समावेशक विकासात साध्य करण्यासाठी 12 व्या पंचवार्षिक योजनेत विशेष प्रयत्न केले जात आहेत. सर्व समावेशक विकास साध्य करण्यासाठी निश्चित उपाययोजना करणे हे सुद्धा नव्या युगाचे आव्हान आहे असे उपाय योजताना काही प्राधान्यक्रम ठरवणे व काही दिशा निश्चित करणे गरजेचे आहे.संयुक्त राष्ट्रसंघाने सुनिश्चित केलेल्या सहस्त्राब्दी विकास लक्ष्यांचा विचार करता सर्वसमावेशक विकासाची व्यूहरचना केली असता आपणास भावी काळात या सर्व आव्हानांना सामोरे जाणे शक्य होणार आहे. या दृष्टीने प्रसार माध्यमांच्या क्षमतांचा कसा उपयोग करता येईल याबाबत चिंतन करण्याची गरज आहे.
भारतासाठी उपयुक्तता
भारत हा वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेचा देश होय. आपल्या लोकशाही व्यवस्थेत सामाजिक व आर्थिक परिवर्तनाला गती देण्यासाठी सर्वसमावेशक व शाश्वत विकास ही कल्पना पूरक ठरणार आहे. आपल्या व्यवस्थेतील भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई, रूढी व परंपराचा प्रभाव, पारदर्शकतेचा अभाव या कारणांमुळे आपल्या देशाची आर्थिक वाढ होवूनही त्यामध्ये समतोल दिसून येत नाही. एका बाजूला आपल्याला विकास दर वाढवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आपणास अधिकाधिक लोकांना विकास प्रक्रियेत सामावून घ्यायचे आहे. भारताला 21 व्या शतकात नवी कार्यसंस्कृती विकसित करावी लागणार आहे. सर्वसमावेशक विकासासाठी नागरी विकासाला गती देण्यावर शहर व ग्रामीण विकासातील आंतर भरून काढणे तसेच संरचनेमध्ये वाढ करणे, शिक्षणाचा दर्जा वाढविणे यावर भर देण्याची गरज आहे. उर्जा, समस्येचे निवारण, सार्वजनिक व खाजगी विकासातील भागीदारी, शहर व ग्रामीण विकासातील संतुलन यासारखे उपायसुद्धा तातडीने योजावे लागतील.  सर्व समावेशक व शाश्वत विकास ही कल्पना भारतासाठी उपयुक्त असून ती रूजविण्यासाठी आपल्या विकास यंत्रणेत संपूर्णपणे रचनात्मक बदल करण्याची गरज आहे. तसेच आपल्या देशातील बाल मजुरी, महिलांचे शोषण, दुर्बल घटकांची उपेक्षा यासारख्या प्रश्नाकडेसुद्धा गांभीर्याने पाहिले पाहिजे. जपान, मलेशिया यासारख्या राष्ट्रांनी जशी कार्य संस्कृती विकसित केली आहे तशी भारतालासुद्धा विकसित करावी लागणार आहे. रूढी, परंपरा व अंधश्रद्धांचा प्रभाव कमी करून लोकांमध्ये विकासाबाबत जाणीव जागृती करण्याची गरज आहे. विकासात प्रत्येक जण वाटेकरी आहे आणि सुशासनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत विकासाची फळे पोहोचविणे अगत्याचे आहे. त्यासाठी नवी व्यूहरचना केली पाहिजे. खासकरून भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या 27 टक्के लोकांसाठी विकासाची मधूर फळे कशी उपलब्ध करता येतील यावर विचार करण्याची गरज आहे. गरीबांच्या बाजूंनी आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी विचार करणे हा शाश्वत विकासाचा खरा आधार होय.
जागतिकीकरणानंतरची आव्हाने
जागतिकीकरणानंतर विकसनशील देशांपुढे अनेक नवीन आव्हाने उभी आहेत. 1990 नंतर भारतात उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा आपला विकास वेग 3.5 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत पोहोचला. आपली कृषी अर्थव्यवस्था सेवा प्रधान अर्थव्यवस्था बनली. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या 55 टक्के घटक हे सेवा उद्योगावर आधारलेले आहेत. माहिती, तंत्रज्ञानाचा विकास हा एक महत्त्वपूर्ण पैलू असून पुढील काही वर्षात भारताचा विकास वेग चीनपेक्षा अधिक वेगाने होवून विकासाची गती चीनपेक्षा अधिक वाढू शकते. तथापि खेड्यात राहणारे लोक विकासापासून वंचित आहेत. कमी व छोट्या जमिनीचे मालक तसेच शेतमजूर आणि कष्टकरी हे शेती उत्पादनात महत्त्वाचे असूनही सामाजिक व आर्थिक विकासापासून दूर आहेत. महिला, मुले व मागास जातीतील लोक हे विकासापासून दूर आहेत.  भारतातील 1 दशांश लोक हे तळागाळातील जीवन जगतात. त्यांना दोन वेळचे जेवण घेण्यासाठी सुद्धा अधिक कष्ट करावे लागतात.
मेळ कसा घालावा
भारताची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करून लोकांचा जीवनस्तर उंचावणे गरजेचे आहे. 2030 साली भारताची लोकसंख्या 1.5 कोटी होईल तेव्हा लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास वस्तू व सेवा यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीसुद्धा प्रयत्न करावे लागतील. वाढत्या आर्थिक गरजा आणि वाढती लोकसंख्या यातला मेळ घालण्यासाठी विकास साधनांचे नियोजन करावे लागेल. सध्या अर्थिक सत्ता ही मूठभर लोकांच्या हाती केलेली आहे. लोकसंख्येपैकी 1 टक्का लोकांच्या हाती 15.9 टक्के संपत्ती आहे तर 5 टक्के लोकांच्या हाती 38.3 टक्के संपत्ती आहे. तर 10 टक्के लोकांच्या 52.9 टक्के संपत्ती आहे. 90 टक्के भारतीय लोक मात्र संपत्तीमध्ये मात्र अल्प प्रमाणात वाटेकरी आहेत. त्यामुळे सर्व समावेशक विकासासाठी संपत्तीचे विवेकी वितरण होण्याची गरज आहे. तळागाळातील माणसांपर्यंत विकासाची फळे पोहोचविण्यासाठी आपली साधनसामग्री गरजा आणि प्राधान्यक्रम यामध्ये मेळ घालण्याची गरज आहे.
सर्वसमावेशक विकासापुढील समस्या
शाश्वत व सर्वसमावेशक विकासापुढील समस्यांचा आढावा घेतला असता असे दिसते की, गरीबी किंवा दारिद्र्य ही भारतापुढील प्रमुख समस्या आहे. तसेच रोजगार निर्मिती हे प्रमुख आव्हान आहे. शेती क्षेत्रातील घसरण थांबविणे, उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. तसेच सामाजिक विकासातसुद्धा अनेक समस्या आहेत. जागतिक मंदीने अनेक संकटे निर्माण केली आहे. भारतामध्ये प्रत्येक राज्यात प्रादेशिक असमतोलही दिसून येतो. सर्वसमावेशक विकास व्यूहरचनेचा विचार करता पुढील काही पैलूंवर भर देण्याची गरज आहे.
1) ग्रामीण संरचना भक्कम केली पाहिजे.
2) महात्मा गांधी रोजगार योजनेत लघु उद्योग निर्माण केले पाहिजेत.
3) शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे.
4) ग्रामीण आरोग्य योजनामध्ये संपूर्ण बदल केला पाहिजे.
5) नागरी विकास संरचना निर्दोष केल्या पाहिजेत.
भावी आव्हाने कोणती ?
शाश्वत व सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी भारताला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. दारिद्र्य व गरीबीमुळे आपण सहस्त्राब्दी विकास लक्ष्ये गाठणे अवघड आहे. गेल्या काही वर्षात चलन फुगवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. जागतिक वातावरण अनिश्चित आहे. अन्न, तेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. युरो डॉलर व अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया दुबळा होत आहे. अनेक चांगल्या योजना आराखडे व धोरणे असून त्यांची अंमलबजावणी मात्र मंद गतीने होत आहे. त्यामुळे विकासाची फळे अपेक्षित वर्गापर्यंत पोहोचत नाहीत. 12 व्या पंचवार्षिक योजनेत सर्वसमावेशक व शाश्वत विकास हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे आणि या अनुषंगाने सर्वसमावेशक विकासासाठी कृषी क्षेत्रातील कामगिरी सुधारली पाहिजे तसेच नोकऱ्या व सेवा संधी यात अधिक जागा निर्माण केल्या पाहिजेत. आरोग्य शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात अधिक सशक्त प्रयत्न केले पाहिजेत. थेट गरीबाला मदत मिळावी म्हणून आपल्या योजनांच्या माहिती प्रसारात गती आणली पाहिजे. मागासलेल्या व उपेक्षित वर्गासाठी विशेष विकास कार्यक्रम आखले पाहिजेत. 12 व्या योजनेतील ही सर्व लक्ष्ये गाठण्यासाठी आपणास अधिक सहभागी प्रयत्न केले पािहजेत.
समारोप
या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की, भारत जगातील एक उभरती अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. एकीकडे भारत काही क्षेत्रात चमकत असताना देशातील गरीब व दुर्बल घटकांना विकासात सहभागी करून घेण्यावर भर दिला पाहिजे. चांगल्या सुशासनास रचनात्मक प्रयत्नाची जोड देवून भावी काळात खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी वाढविली पाहिजे. बहुराष्ट्रीय उद्योगांनी सामाजिक जबाबदारीचे प्रकल्प काळजीपूर्वक आखले पाहिजेत. त्यामुळे संरचनात्मक विकास होवून विविध सामाजिक क्षेत्रात लोककल्याणकारी योजना गतीने कृतीत येवू शकतील. सहभागी विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून देशातील उद्योग समूह तसेच सेवाभावी संस्थांनी सुद्धा त्यात वाटा उचलला पाहिजे. शाश्वत विकासासाठी खूप काही करता येवू शकते परंतु आपला विकास वेग गतीने वाढविण्यासाठी पुढील बाबींवर भर दिला पाहिजे.
1) आर्थिक विकासात समानता व सहभाग हे प्राणतत्त्व आहेत.
2) शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असल्यामुळे शेती विकासाकडे दुर्लक्ष करता कामा नये. 3) आर्थिक सुधारणा करताना गरीबांना अनुकूल धोरणे राबविली पाहिजेत.
4) शेती, उद्योग व सेवा क्षेत्रे यामध्ये रचनात्मक बदल घडून आले पाहिजेत.
5) उत्पादक, रोजगार क्षमता वाढविण्यासाठी संरचनात्मक विकासावर भर दिला पाहिजे.
शिक्षणासारख्या क्षेत्रात संधीची समानता व गुणवत्ता यावर भर दिला पाहिजे. पूर्व आशियाई राष्ट्रांचा अनुभव लक्षात घेवून सेवा उद्योगात क्षमता संवर्धन केले पाहिजे. सुधारणांची दिशा बदलून लाभांच्या वितरणाची नवी प्रणाली विकसित केली पाहिजे. महिलांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. उद्योगाचे विकेंद्रीकरण करून आर्थिक सुधारणातून नवे सामाजिक व आर्थिक राजकीय वातावरण तयार केले पाहिजेत. या सर्व सुधारणांची दिशा ही शाश्वत व सर्वसमावेशक विकासावर भर देणारी असली पाहिजे. शाश्वत विकास हा सर्वसमावेशक विकासाचा एक भाग बनला आहे. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध साधनांचे विवेकी उपयोजन करणे गरजेचे आहे. सध्याच्या विकास योजना अशा पद्धतीने राबविल्या पाहिजेत की भावी पिढीच्या गरजासुद्धा योजकतेने पूर्ण होवू शकतील. या दिशेने गरजा साधणे आणि नवे तंत्रज्ञान यांच्या समन्विक वापरातून शाश्वत व सर्वसमावेशक विकासाचे ध्येय साध्य करता येवू शकेल.

प्रतिक्रिया

  1. सर्व मुद्यांच उत्तम रित्या आढावा घेतला आहे .

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमचा ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.

*

( Press Ctrl+g to toggle between English and Marathi )