इनामी जमिनीची विक्री करण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली

प्रतिक्रिया

वैजापूर (वार्ताहर)- तालुक्यातील पानवी खुर्द शिवारातील 3 हेक्टर 23 आर इनामी जमिनीची विक्री नियमानुकूल करण्याची विनंती अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयाने फेटाळली आहे.
तब्बल 44 वर्षापूर्वी खरेदी केलेल्या या जमिनीचा निकाल नुकताच लागला असून विशेष म्हणजे या प्रकरणातील दोन्ही बाजू कडील 29 जण मयत झालेले आहेत. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या या निकालाबाबतची अधिक माहिती अशी की, पानवी खूर्द येथील एकनाथ काशीनाथ तुपे यांनी 8 मे 1967 रोजी सुभान लिंबा जाधव, परभत कृष्णा जाधव, गवजी मल्हारी जाधव, तात्या चोखा जाधव, पुंजा वाजी जाधव, पांडू पुंजा जाधव, व रामा सुका जाधव सर्व रा. पानवी खूर्द व चांडगाव यांच्याकडून जमिनीची कायम खरेदी केली. परंतू गट नं.59 ते 63 व 70 ते 73 या सर्व्हे नं.35 मधील 3 हेक्टर 24 आर ही जमीन जाधव मंडळीस कनिष्ठ वतन निर्मूलन कायद्याखाली मिळालेली असल्याबद्दल तुपे यांना कल्पना देण्यात आली नाही. सन 1979 मध्ये जमिनीच्या मुळ मालकांनी वैजापूरच्या तहसीलदाराकडे अर्ज करून जमिनीचा ताबा देण्याची विनंती केली. परंतु तहसीलदारांनी मुळ मालकाचा अर्ज नामंजूर केला. त्यानंतर जमीन विक्री करणाऱ्यांनी औरंगाबाद येथील महाराष्ट्र महसूल न्यायालयात फे रतपासणीसाठी अर्ज केला. ते प्रकरण पुन्हा खालच्या कोर्टात नव्याने सुनावणी करून निर्णयासाठी पाठविण्यात आले. त्यानुषंगाने उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी तहसीलदार यांच्याकडून अहवाल मागविला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या बाबतचे जाहीर प्रगटन स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. त्यावर मयत परभत कृष्णा जाधव यांचे वारस कृष्णा परभत जाधव यांच्यासह 17 जणांनी आपला आक्षेप अर्ज दाखल केला. ही जमीन महार हाडोळा (इनामी) असल्याने जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय खरेदी खत होत नाही असा आक्षेप त्यांनी नोंदविला. आक्षेप अर्ज प्राप्त  झाल्यानंतर प्रकरणात सुनावणीसाठी संबंधितांना नोटीसा पाठविण्यात आल्या. सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तीवाद नोंदविण्यात येऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले व अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी अर्जदार विठ्ठल एकनाथ तुपे यांचे खरेदीखत नियमानुकूल करण्याची विनंती फेटाळून लावली. तसेच गैरअर्जदारांचा आक्षेप अर्जही मंजूर करण्यात आला. नुकताच हा निकाल लागला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमचा ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.

*

( Press Ctrl+g to toggle between English and Marathi )